~ जरासे स्मरणरंजन ~

गेल्या जून महिन्यामध्ये मी भारतवारी केली. यावेळी अनेक वर्षांनी मी माझ्या आवडत्या महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणे – अकोला प्रवास केला. या ट्रेनबरोबर माझा जुना ऋणानुबंध आहे. बारामतीला शिकत असताना सत्रांमधील व दिवाळीच्या सुटीमध्ये घरी जायला महाराष्ट्र एक्सप्रेस फार सोयीची होती.

तर यावेळी ट्रेन सकाळी जळगावला पोचल्यावर मी अप्पर बर्थवरून खाली उतरलो व खिडकी शेजारी बसलो. थोड्या वेळाने भुसावळ स्थानक आल्यावर फलाटावरील विक्रेते नजरेस पडले. माझे तिकिट एसीचे असल्याने अशा विक्रेत्यांना माझ्या बोगीच्या आत प्रवेश नव्हता. पण या दृश्यामुळे माझ्या स्मृतीपटलावर एक जुनी आठवण परतली. दहा बारा वर्षांपूर्वी दरवेळी घरी जाताना भुसावळ स्थानकानंतर एका अंध विक्रेत्याशी हमखास गाठ पडायची. अतिशय सचोटीने तो आपल्या वस्तू विकायचा. त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव कधीही दिसले नाहीत. योगायोगाने दरवेळी मी त्याच्याकडून काही ना काही खरेदी करायचो. पाच दहा रुपयांचेच का होईना नक्की विकत घ्यायचो.

दुसऱ्या तिसऱ्या वेळेपासून तो मला ओळखू लागला. मी विद्यार्थी आहे हे कळल्यावर दर वेळी न चुकता तो मला अभ्यासासाठी शुभेच्छा देत असे. शेवटच्या सुटीच्या वेळी माझी एका नावाजलेल्या कंपनीमध्ये निवड झाली आहे हे सांगितल्यावर त्याला फार आनंद झाला होता.

त्यानंतर त्याच्याशी माझी पुन्हा कधीही गाठ पडली नाही. अन ट्रेनचा फारसा प्रवास न झाल्याने त्याची फारशी आठवणही आली नाही. परंतु यंदाच्या सुटीतील ट्रेनच्या प्रवासामुळे मनाच्या कोपऱ्यात खोलवर दडून बसलेली त्याच्याबद्दलची स्मृती परत वर आली. त्याची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग जरी आला नाही तरी त्याची आठवण होणे हेच मला सुखावणारे होते. तो जिथे कुठे असेल तिथे तो बरा असावा अशी मी मनातल्या मनात प्रार्थना केली. अन या आठवणीबाबत देवाचे आभार मानले.

6 thoughts on “~ जरासे स्मरणरंजन ~

  1. छान छोटेखानी लेख. अशी किती अनोळखी माणसं आठवणी ठेवून जातात.

    लिहित रहा.

    Liked by 1 person

  2. अशा अनेक माणसांच्या अनेक आठवणी असतात – एरवी विस्मृतीत गेल्यासारख्या वाटणा-या; पण खोल दडून बसलेल्या …

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s