रायडींग ऑन अ सनबीम

मौक्तिक कुलकर्णी – एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या. २००८ साली त्याने त्याची पहिली बॅकपॅकिंग मोहीम पार पाडली. ही मोहीम होती दक्षिण अमेरिकेतील चार देशांमध्ये मोटरसायकलवरून एकट्याने केलेली ५००० मैलांची भ्रमंती. या प्रवासावर त्याने ‘A Ghost of Che‘ हे पुस्तक लिहिले. शिक्षण व नोकरीनिमित्त अमेरिकेत काही वर्षे राहिलेल्या मौक्तिकने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी त्याने ३६ देशांची वर्षभर भटकंती केली.

भारतात परतल्यानंतर त्याची गाठ राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्रह्मानंद सिंग यांच्याशी पडली. दोघांमधील चर्चेच्या वेळी ब्रह्मानंद सिंग यांना वाटले की या सर्व भटकंतीच्या मोहिमांवर आधारीत एखादी डॉक्युमेंट्री फिल्म करण्याची संधी गमावली गेली आहे. त्यावर मौक्तिकने भारतात अशीच मोहीम पार पाडण्याचा मनोदय बोलून दाखवला. यातूनच आपल्या देशाबद्दल जरा अपारंपरिक डॉक्युमेंट्री बनवावी ही कल्पना पुढे आली. या मोहिमेदरम्यान प्रसिद्ध पर्यटनस्थळे टाळून वेगळा भारत अनुभवावा व चित्रित करावा. विशेषकरून विविध भागांतील सर्वसामान्य लोक कसे जगतात, त्यांच्या विचारसरणी, स्वभाव आणि त्यांच्यातले विरोधाभास टिपता येतील.

ब्रह्मानंद यांनी मौक्तिकच्या जोडीला सामंथा जो फिट्झसिम्न्स हिला सादर करायचे ठरवले. सामंथाने कॅलिफोर्नियातील बर्कली येथील विद्यापीठात मानववंशसास्त्राचे (Anthropology) व संगीताचे शिक्षण घेतले आहे. या प्रकारे जगभर भटकलेला भारतीय मुलगा व पूर्वी भारत न पाहिलेली मुलगी यांच्या नजरेतून भारताचे दर्शन घडवता येईल.

चित्रीकरणाचे काम पुर्ण झाल्यावर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या एडिटर आयरीन धर मलिक यादेखील मौक्तिक व ब्रह्मानंद यांच्या चमूमध्ये सामील झाल्या. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मौक्तिक व सामंथा यांचा प्रवास समजून घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अन त्यानंतरच हे चित्रण अधिक प्रेक्षणीय बनवण्यासाठी त्यांनी आपले काम सुरू केले.

ये जवानी हैं दिवानी, क्वीनसारख्या नव्या हिंदी चित्रपटांतून पर्यटनाच्या बॅकपॅकिंग या प्रकाराची ओळख भारतीय प्रेक्षकांना होऊ लागली आहे. तरीही अजूनही आपल्या तरुणाईने हा प्रकार त्या प्रमाणात स्वीकारलेला नाही. रायडींग ऑन अ सनबीम ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांना या प्रकारच्या पर्यटनाबद्दल आकर्षित करण्यात नक्की यशस्वी होईल. भारत वैविध्यपूर्ण, काहीसा अनाकलनीय पण तरीही उमेदीने व प्रेमाने भरलेला देश आहे याची झलक या चित्रपटातून दिसून येईल.

३६ देशांमधल्या भटकंतीतून निरनिराळ्या संस्कृती न्याहाळल्यानंतर मौक्तिकचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी उदारमतवादी, कधी मिश्किल तर कधी तात्त्विक असा झाला आहे. सौंदर्यवती सामंथा हिची भर पडल्यामुळे हा प्रवास अधिकच आकर्षक झाला आहे.आपण भारताबद्दल कुठलंही विधान केलं तरी त्याविरुद्धचं विधानही तेवढंच खरं असत हे तर आपल्याला पदोपदी जाणवतं. या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी ब्रह्मानंद यांनी मौक्तिक या न्युरोसायंटीस्टच्या व सामंथा या ऍन्थ्रोपोलॉजिस्टच्या नजरेतून विविध उदाहरणांच्या मदतीने आपल्या देशाबद्दलचं एक छान कोलाज पडद्यावर उमटवायचं ठरवलं आहे.

यातून तयार झालेला हा चित्रपट कधी खेळकरपणे तर कधी गंभीरपणे प्रेक्षकांना भारताच्या सद्य परिस्थितीतल्या विरोधाभासाची सैर घडवून आणतो. काही आर्थिकदृष्ट्या पुढारलेले तर काही अजूनही मागासलेले खेडेगाव, कट्टर देशाभिमान जागृत असलेले व देशविरोधी चळवळी सुरू असलेले प्रदेश, सांस्कृतिक वारसा जपणारी अन पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारी शहरे असे भारताचे विविध पैलू या चित्रपटातून दिसून येतील.

“गॅप इयर किंवा शाळा कॉलेजचे शिक्षण संपल्यावर एक वर्ष सुटी घेऊन जग फिरणे ही प्रथा युरोपियन, अमेरिकन अन ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये प्रचलित आहे. अशा प्रवासांतून शिकायला मिळणारे आयुष्याबद्दलचे धडे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. याउलट आपल्या देशात अशा उपक्रमांकडे वेळ वाया घालवण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं जातं” असं मौक्तिक म्हणतो.

“मागच्या वर्षी अमेरिकेतून परत आल्यानंतर मी भारतभर बऱ्याच ठिकाणी युवा पिढीबरोबर व्याख्यानांच्या माध्यमातून संवाद साधला. त्यातून आजचा भारतीय युवक जागा झाला आहे आणि त्याला वेगळं काही तरी करून दाखवायची उमेद आहे हे मला स्पष्टपणे आढळून आलं आहे. आता ही युवाशक्ती हिंसक आंदोलनांत वाया जाण्याऐवजी तिला योग्य दिशा दाखवणं आवश्यक आहे. रायडींग ऑन अ सनबीमच्या द्वारे आम्ही तरुणांमध्ये बॅगपकिंगचा प्रवास लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्षभरापूर्वी एक पेन घेऊन कागदावर जी संकल्पना मांडली होती, तिचं रूपांतर एका चित्रपटात झालेलं आहे, इति मौक्तिक.

चित्रपटाचा प्रोमो व्हिडिओ

मौक्तिक व या चित्रपटाच्या संपूर्ण चमुला चित्रपटाच्या यशस्वितेसाठी मनपूर्वक शुभेच्छा!!

या प्रकल्पासाठी पैसे उभारण्यासाठी चित्रपटाच्या चमूने पब्लिक फंडिंगचा (https://www.wishberry.in/campaign/riding-sunbeam/)  अभिनव मार्ग स्वीकारला आहे. या प्रकल्पाबद्दल कुठलेही प्रश्न असल्यास मौक्तिक कुलकर्णी यांना संपर्क करावा. त्यांचा ईमेल पत्ता – mauktikk@yahoo.com

~ जरासे स्मरणरंजन ~

गेल्या जून महिन्यामध्ये मी भारतवारी केली. यावेळी अनेक वर्षांनी मी माझ्या आवडत्या महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणे – अकोला प्रवास केला. या ट्रेनबरोबर माझा जुना ऋणानुबंध आहे. बारामतीला शिकत असताना सत्रांमधील व दिवाळीच्या सुटीमध्ये घरी जायला महाराष्ट्र एक्सप्रेस फार सोयीची होती.

तर यावेळी ट्रेन सकाळी जळगावला पोचल्यावर मी अप्पर बर्थवरून खाली उतरलो व खिडकी शेजारी बसलो. थोड्या वेळाने भुसावळ स्थानक आल्यावर फलाटावरील विक्रेते नजरेस पडले. माझे तिकिट एसीचे असल्याने अशा विक्रेत्यांना माझ्या बोगीच्या आत प्रवेश नव्हता. पण या दृश्यामुळे माझ्या स्मृतीपटलावर एक जुनी आठवण परतली. दहा बारा वर्षांपूर्वी दरवेळी घरी जाताना भुसावळ स्थानकानंतर एका अंध विक्रेत्याशी हमखास गाठ पडायची. अतिशय सचोटीने तो आपल्या वस्तू विकायचा. त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव कधीही दिसले नाहीत. योगायोगाने दरवेळी मी त्याच्याकडून काही ना काही खरेदी करायचो. पाच दहा रुपयांचेच का होईना नक्की विकत घ्यायचो.

दुसऱ्या तिसऱ्या वेळेपासून तो मला ओळखू लागला. मी विद्यार्थी आहे हे कळल्यावर दर वेळी न चुकता तो मला अभ्यासासाठी शुभेच्छा देत असे. शेवटच्या सुटीच्या वेळी माझी एका नावाजलेल्या कंपनीमध्ये निवड झाली आहे हे सांगितल्यावर त्याला फार आनंद झाला होता.

त्यानंतर त्याच्याशी माझी पुन्हा कधीही गाठ पडली नाही. अन ट्रेनचा फारसा प्रवास न झाल्याने त्याची फारशी आठवणही आली नाही. परंतु यंदाच्या सुटीतील ट्रेनच्या प्रवासामुळे मनाच्या कोपऱ्यात खोलवर दडून बसलेली त्याच्याबद्दलची स्मृती परत वर आली. त्याची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग जरी आला नाही तरी त्याची आठवण होणे हेच मला सुखावणारे होते. तो जिथे कुठे असेल तिथे तो बरा असावा अशी मी मनातल्या मनात प्रार्थना केली. अन या आठवणीबाबत देवाचे आभार मानले.